71 - Nooh ()

|

(1) १. निःसंशय, आम्ही नूह (अलै.) यांना त्यांच्या जनसमूहाकडे पाठविले की आपल्या जनसमूहाला खबरदार करा (आणि सावध करा) यापूर्वी की त्यांच्याजवळ दुःखदायक अज़ाब (शिक्षा - यातना) येऊन पोहचावा.

(2) २. (नूह अलै.) म्हणाले, हे माझ्या जनसमूहाच्या लोकांनो! मी तुम्हाला स्पष्टपणे खबरदार करणारा आहे.

(3) ३. की तुम्ही अल्लाहची उपासना करा आणि त्याचेच भय बाळगा आणि माझे म्हणणे मान्य करा.

(4) ४. तर तो तुमचे अपराध माफ करील, आणि तुम्हाला एका निर्धारित वेळे पर्यर्ंत सवड देईल.१ निःसंशय, अल्लाहचा वायदा (निर्धारित समय) जेव्हा येतो, तेव्हा तो टळत नाही. तुम्हाला हे माहीत असते तर (बरे झाले असते!)
(१) अर्थात ईमान राखण्याच्या स्थितीत, तुमच्या मृत्युचा आणि जो निर्धारित आहे, तो टळून तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करील आणि तो अज़ाब तुमच्यावरून दूर करील, जो ईमान न राखण्याच्या स्थितीत तुमच्या नशिबी होता. या आयतीद्वारे हे सांगितले गेले आहे की, आज्ञापालन, सत्कर्म व सदाचरण, नातेवाईकांशी सद्‌व्यवहार केल्याने आयुष्य वाढते. हदीसमधील उल्लेखानुसार ‘मिल्लतुर्रहीमी तज़िजुफील उमुर.’ ‘‘नातेवाईकांशी सद्‌व्यवहार आयुष्य वाढण्याचे कारण आहे.’’ (इब्ने कसीर)

(5) ५. (नूह) म्हणाले, हे माझ्या पालनकर्त्या! मी आपल्या जनसमूहाच्या लोकांना रात्रंदिवस तुझ्याकडे बोलाविले आहे.

(6) ६. तथापि माझ्या बोलाविण्याने हे लोक पळ काढण्यात आणखी वाढतच गेले.

(7) ७. आणि जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलाविले, यासाठी की तू त्यांना माफ करावे, तेव्हा त्यांनी आपली बोटे आपल्या कानात खुपसलीत आणि आपली वस्त्रे (अंगावर) टाकून घेतली, आणि अडून राहिले व मोठा अहंकार केला.

(8) ८. मग मी त्यांना उंच स्वरात बोलाविले.

(9) ९. आणि निःसंशय, मी त्यांना उघडपणेही सांगितले व गुपचुपरित्याही.

(10) १०. आणि मी म्हणालो की आपल्या पालनकर्त्याकडून आपले अपराध माफ करवून घ्या (आणि क्षमा-याचना करा). निःसंशय, तो मोठा माफ करणारा आहे.

(11) ११. तो तुमच्यावर आकाशाला खूप पर्जन्यवृष्टी करताना सोडील.

(12) १२. आणि तुम्हाला धन-संपत्ती आणि संततीच्या विपुलतेत वाढविल, आणि तुम्हाला बाग प्रदान करील व तुमच्यासाठी प्रवाह जारी करील.

(13) १३. तुम्हाला झाले तरी काय की तुम्ही अल्लाहच्या महानतेवर विश्वास करीत नाही.

(14) १४. वास्तविक त्याने तुम्हाला अनेकरित्या निर्माण केले आहे.

(15) १५. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाहने कशा प्रकारे वर खाली सात आकाश निर्माण केले आहेत?

(16) १६. आणि त्या चंद्राला खूप झगमगणारा बनविले आणि सूर्याला तेजस्वी दीप बनविले.

(17) १७. आणि तुम्हाला जमिनीतून (एका विशेष पद्धतीने) उगविले (निर्माण केले आहे)

(18) १८. मग तुम्हाला तिच्यातच परतविल आणि (एका विशेषरितीने) पुन्हा तुम्हाला बाहेर काढील.

(19) १९. आणि तुमच्यासाठी धरतीला अल्लाहने बिछाईत बनविले.

(20) २०. यासाठी की तुम्ही तिच्या विस्तृत मार्गावर चालावे फिरावे.

(21) २१. (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! त्या लोकांनी माझी अवज्ञा केली, आणि अशांचे आज्ञापालन केले, ज्यांच्या संपत्ती व संततीने त्यांच्या नुकसानातच भर घातली.

(22) २२. आणि त्या लोकांनी फार मोठा धोका (कपट) केला.

(23) २३. आणि ते म्हणाले की कधीही आपल्या दैवतांना सोडू नका, आणि ना वद्द, सुवाअ, यगूस, यअुक आणि नस्रला (सोडा).१
(१) ही नूह यांच्या जनसमूहातील पाच सदाचारी माणसे होती, ज्यांची ते लोक उपासना करत असत आणि त्यांची एवढी ख्याती झाली की असब देशातही त्यांची पूजा होत राहिली. उदा. ‘वद्द’ दूमतुल जनदल (ठिकाणी) कल्ब कबिल्याचा, ‘सुवाअ’ समुद्रतटाचा कबिला हुजैलचा, ‘यगूस’ सबाजवळील जुर्फ नावाच्या ठिकाणी मुराद व बनू गुतैफचा. ‘यऊक’ हमदान कबिल्याचा आणि ‘नस्र’ हिम्यर जमातीचा कबिला जुल कलाअचा उपास्य होता. (इब्ने कसीर, फतहुल कदीर) हे पाचही लोक नूह जनसमूहाचे नेक सदाचारी लोक होते. जेव्हा हे मरण पावले, तेव्हा सैतानाने त्यांच्या श्रद्धाळूंना म्हटले की त्यांचे चित्र (फोटो) बनवून आपल्या घरात आणि दुकानात ठेवा, यासाठी की त्यांचे स्मरण राहावे आणि त्यांचे ध्यान धरून तुम्हीही सत्कर्म करीत राहा. जेव्हा हे चित्र बनवून ठेवणारे मरण पावले, तेव्हा त्याच्या वंशजांना सैतानाने हे सांगून शिर्कच्या अपराधात ग्रस्त केले की तुमचे पूर्वज तर यांची भक्ती उपासना करीत असत. ज्यांचे चित्र तुमच्या घरांमध्ये लावलेले आहे, यास्तव त्यांनी त्यांची पूजा सुरू केली. (सहीह बुखारी, तफसीर सूरह नूह)

(24) २४. आणि त्यांनी अनेक लोकांना मार्गभ्रष्ट केले. (हे पालनकर्त्या!) तू या अत्याचारी लोकांच्या मार्गभ्रष्टतेत आणखी वाढ कर.

(25) २५. हे लोक आपल्या अपराधांपायी (पाण्यात) बुडविले गेले आणि जहन्नममध्ये पोहचविले गेले आणि अल्लाहखेरीज त्यांना आपला कोणी मदत करणारा आढळला नाही.

(26) २६. आणि (नूह) म्हणाले की हे माझ्या पालनकर्त्या! तू या धरतीवर कोणत्याही काफिराला (इन्कार करणाऱ्याला) वास्तव्य करणारा सोडू नकोस.

(27) २७. जर त्यांना तू सोडशील तर निःसंशय हे तुझ्या दुसऱ्या दासांनाही मार्गभ्रष्ट करतील आणि हे दुष्कर्म करणाऱ्या काफिरांनाच जन्म देतील.

(28) २८. हे माझ्या पालनकर्त्या! तू मला आणि माझ्या माता-पित्याला आणि जे देखील ईमान राखून माझ्या घरात येतील आणि समस्त ईमानधारक पुरुषांना आणि समस्त ईमानधारक स्त्रियांना माफ कर आणि काफिरांना विनाशाखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीत वृद्धिंगत करू नकोस.