(1) १. अलिफ. लाम. मीम १
१ सूरह अलिफ लाम मीम अस्सजदा हदीसमधील उल्लेखानुसार पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शुक्रवारच्या दिवशी प्रातःकालीन (फज्र) नमाजमध्ये अलिफ-लाम-मीम अस्सजदा (आणि दुसऱ्या रकअतमध्ये) सूरह दहरचे पठण करीत असत. (सहीह बुखारी आणि मुस्लिम किताबुल जुमा) त्याचप्रमाणे हेदेखील योग्य प्रमाणाद्वारे सिद्ध आहे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झोपण्यापूर्वी सूरह अलिफ-लाम-मीम अस्सजदा आणि सूरह मुल्कचे पठण करीत असत. (तिर्मिजी नं. ८१२ आणि मुसनद अहमद ३४०/३)
(2) २. निःसंशय, हा ग्रंथ सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित झाला आहे.
(3) ३. काय हे असे म्हणतात की याने हा ग्रंथ मनाने रचून घेतला आहे?१ मुळीच नाही. किंबहुना हा तुमच्या पालनकर्त्यातर्फे सत्य आहे, यासाठी की तुम्ही त्यांना भय दाखवावे, ज्यांच्याजवळ तुमच्यापूर्वी कोणी भय दाखविणारा आला नाही. संभवतः ते सत्य मार्गावर यावेत.
(१) हे खडसावून सांगण्याच्या पद्धतीने आहे की काय समस्त विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केल्या गेलेल्या या महत्त्वपूर्ण ग्रंथाविषयी असे म्हणतात की यास स्वतः (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांनी रचले आहे.
(4) ४. अल्लाह तो आहे, ज्याने आकाशांना आणि धरतीला आणि जे काही त्यांच्या दरम्यान आहे, सर्व काही सहा दिवसांत निर्माण केले, मग अर्श (ईशसिंहासना) वर उच्च झाला. तुमच्याकरिता, त्याच्याखेरीज कोणीही मदत करणारा, शिफारस करणारा नाही, मग काय तरीही तुम्ही बोध ग्रहण करीत नाही?
(5) ५. तो आकाशापासून धरतीपर्यंत कार्य-व्यवस्था करतो, मग (ते कार्य) एका अशा दिवसात त्याच्या दिशेने वर चढते, ज्याचे अनुमान तुमच्या हिशोबाच्या एक हजार वर्षांइतके आहे.
(6) ६. तोच विद्यमान आणि अपरोक्षाचा जाणणारा आहे, जबरदस्त वर्चस्वशाली, मोठा मेहेरबान.
(7) ७. त्याने जी वस्तु देखील बनविली खूप सुंदर बनविली आणि मानवाची निर्मिती मातीपासून सुरू केली.
(8) ८. मग त्याचा वंश एका तुच्छ पाण्याच्या सार तत्त्वाने बनविला.
(9) ९. ज्याला यथायोग्य करून, त्यात आपला प्राण (रुह) फुंकला, आणि त्यानेच तुमचे कान, डोळे आणि हृदय बनविले (तरीदेखील) तुम्ही फारच कमी कृतज्ञता दाखविता.
(10) १०. आणि ते म्हणाले की काय आम्ही जेव्हा जमिनीत मिसळून हरवले जाऊ, काय मग पुन्हा नव्या जीवनात येऊ? खरी गोष्ट अशी की या लोकांना आपल्या पालनकर्त्याच्या भेटीचा विश्वासच नाही.
(11) ११. त्यांना सांगा, तुम्हाला मृत्युचा फरिश्ता मरण देईल जो तुमच्यावर तैनात केला गेला आहे, मग तुम्ही सर्व आपल्या पालनकर्त्याकडे परतविले जाल.
(12) १२. आणि जर तुम्ही यांना (त्या वेळच्या अवस्थेत) पाहिले असते, जेव्हा दुराचारी लोक आपल्या पालनकर्त्यासमोर नतमस्तक असतील, म्हणतील की हे आमच्या पालनकर्त्या! आम्ही पाहिले आणि ऐकले, आता तू आम्हाला परत पाठवशील तर आम्ही सत्कर्म करू. आम्ही ईमान राखणारे आहोत.
(13) १३. आणि आम्ही इच्छिले असते तर प्रत्येक माणसाला मार्गदर्शन प्रदान केले असते, परंतु माझी ही गोष्ट पूर्णतः खरी ठरली आहे की मी अवश्य जहन्नमला माणसांनी व जिन्नांनी भरून टाकीन.
(14) १४. आता तुम्ही आपल्या त्या दिवसाच्या भेटीला विसरण्याची गोडी चाखा. आम्हीही तुम्हाला विसरलो, आपण केलेल्या कर्मांच्या (दुष्परिणती) द्वारे निरंतर शिक्षा- यातनेची गोडी चाखा.
(15) १५. आमच्या आयतींवर केवळ तेच लोक ईमान राखतात, ज्यांना जेव्हा जेव्हा शिकवण दिली जाते तेव्हा सजद्यात जातात (माथा टेकतात) आणि आपल्या पालनकर्त्याची प्रशंसेसह तस्बीह (गुणगान) करतात आणि गर्वापासून अलिप्त राहतात.
(16) १६. त्यांची कूस आपल्या बिछान्यांपासून अलग राहते. आपल्या पालनकर्त्याला भय आणि आशेसह पुकारतात आणि जे काही आम्ही त्यांना देऊन ठेवले आहे त्यातून खर्च करतात.
(17) १७. कोणताही जीव जाणत नाही, जे काही आम्ही त्यांच्या डोळ्यांची शितलता त्यांच्यासाठी लपवून ठेवली आहे. ते जे काही करीत होते, हा त्याचा मोबदला आहे.
(18) १८. काय तो, जो ईमान राखणारा असेल, त्या माणसासारखा आहे, जो दुराचारी असेल? दोन्ही कदापि समान ठरू शकत नाही.
(19) १९. ज्या लोकांनी ईमान स्वीकारले आणि जे सत्कर्म करीत राहिले, त्यांच्यासाठी सदैवकाळ असणारी जन्नत आहे, अतिथ्य आहे त्यांच्या कर्मांच्या मोबदल्यात जे ते करीत होते.
(20) २०. तथापि ज्यांनी अवज्ञा केली तर त्यांचे ठिकाण जहन्नम आहे, जेव्हा जेव्हा ते त्यातून बाहेर पडू इच्छितील, पुन्हा त्यातच परतविले जातील आणि त्यांना सांगितले जाईल, आपल्या खोटे ठरविण्यापायी आगीची गोडी चाखा.
(21) २१. आणि निःसंशय, आम्ही त्यांना निकटच्या काही लहान शिक्षा - यातना,१ त्या मोठ्या अज़ाबच्या व्यतिरिक्त चाखवू यासाठी की त्यांनी रुजू व्हावे.
(१) निकटच्या काही शिक्षा - यातनांशी अभिप्रेत ऐहिक यातना किंवा ऐहिक जीवनातील दुःख आणि रोग वगैरे होत. काहींच्या मते यास अभिप्रेत हत्या होय. ज्याद्वारे बद्रच्या युद्धात काफिर पीडित झाले किंवा तो दुष्काळ होय जो मक्काच्या रहिवाशांवर पडला होता. इमाम शौकानी म्हणतात, या सर्व अवस्था आणि परिस्थितीचा यात समावेश होऊ शकतो.
(22) २२. आणि त्याहून अधिक अत्याचारी कोण आहे, ज्याला अल्लाहच्या आयतींद्वारे प्रवचन दिले जावे तरीही त्याने त्यापासून तोंड फिरवावे. निश्चितच आम्हीही दुराचाऱ्यांशी सूड (बदला) घेणार आहोत.
(23) २३. आणि वस्तुतः आम्ही मूसाला ग्रंथ प्रदान केला तेव्हा तुम्ही त्याच्या प्राप्तीसंबंधी कधीही संशय करू नये आणि आम्ही त्यास इस्राईलच्या संततीच्या मार्गदर्शनाचे साधन बनविले.
(24) २४. आणि आम्ही त्यांच्यापैकी ज्याअर्थी त्या लोकांनी सहनशीलता राखली असे नेते (प्रमुख) बनविले, जे आमच्या आदेशाने लोकांना मार्गदर्शन करीत होते आणि आमच्या आयतींवर विश्वास ठेवत होते.
(25) २५. निःसंशय, तुमचा पालनकर्ता त्या सर्वांच्या दरम्यान या सर्व गोष्टींचा फैसला कयामतच्या दिवशी करेल, ज्या गोष्टींमध्ये ते मतभेद करीत आहेत.
(26) २६. काय या गोष्टीनेही त्यांना मार्गदर्शन प्रदान केले नाही की आम्ही त्यांच्या पूर्वीच्या अनेक जमातींना नष्ट करून टाकले, ज्यांच्या वस्त्यांमध्ये हे चालत फिरत आहेत. निश्चितच त्यात मोठे बोध आहेत. काय तरीही हे ऐकत नाही?
(27) २७. काय हे पाहत नाही की आम्ही पाण्याला पडीक (नापीक) जमिनीकडे वाहवून नेतो, मग त्याद्वारे आम्ही शेतींना उगवितो, ज्यास त्यांची गुरे-ढोरे आणि ते स्वतःही खातात. काय तरीही यांना दिसून येत नाही?
(28) २८. आणि म्हणतात, हा फैसला केव्हा होईल? जर तुम्ही सच्चे असाल तर सांगा.
(29) २९. त्यांना उत्तर द्या की फैसल्याच्या दिवशी ईमान राखणे कुप्र (इन्कार) करणाऱ्यांच्या काहीच उपयोगी पडणार नाही आणि ना त्यांना ढील (सवड) दिली जाईल.
(30) ३०. आता तुम्ही त्यांचा विचारही सोडून द्या आणि प्रतीक्षा करीत राहा. हे देखील प्रतीक्षा करीत आहेत.