42 - Ash-Shura ()

|

(1) १. हा मीम.

(2) २. ऐन. सीन. काफ.

(3) ३. अल्लाह, जो मोठा वर्चस्वशाली आणि हिकमतशाली आहे, अशा प्रकारे तुमच्याकडे आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांकडे वहयी पाठवित राहिला.

(4) ४. जे काही आकाशांमध्ये आहे आणि जे काही धरतीत आहे सर्व त्याचेच आहे आणि तो सर्वोच्च व सर्वांत महान आहे.

(5) ५. निकट आहे की आकाश आपल्यावरून विदीर्ण व्हावे, आणि सर्व फरिश्ते आपल्या पालनकर्त्याची पवित्रता त्याच्या प्रशंसेसह वर्णन करीत आहेत आणि धरतीवर असणाऱ्यांकरिता क्षमा-याचना करीत आहेत. खूप लक्षात घ्या की अल्लाहच माफ करणारा, दया करणारा आहे.

(6) ६. आणि ज्या लोकांनी त्याच्याखेरीज दुसऱ्यांना औलिया (मित्र, सहाय्यक) बनवून घेतले आहे, अल्लाह त्यांना चांगल्या प्रकारे पाहत आहे, आणि तुम्ही त्यांच्याकरिता उत्तरदायी (जबाबदार) नाहीत.

(7) ७. आणि त्याच प्रकारे आम्ही आपल्याकडे अरबी कुरआनाची वहयी केली आहे, यासाठी की तुम्ही मक्का आणि त्याच्या जवळपासच्या इलाक्यात राहणाऱ्यांना खबरदार करावे आणि एकत्रित केले जाण्याच्या दिवसापासून, ज्याच्या येण्याबाबत काही शंका नाही, भय दाखवावे. एक गट जन्नतमध्ये असेल आणि एक गट जहन्नममध्ये असेल.

(8) ८. जर अल्लाहने इच्छिले असते तर त्या सर्वांना एकच समुदाय (उम्मत) बनविले असते, परंतु तो ज्याला इच्छितो आपल्या दया-कृपेत सामील करतो आणि अत्याचारींचा पाठीराखा आणि सहाय्यक कोणीही नाही.

(9) ९. काय त्या लोकांनी अल्लाहखेरीज दुसरे कार्य साधक बनवून घेतले आहे, (वस्तुतः) अल्लाहच वाली (संरक्षक) आहे. तोच मृतांना जिवंत करील आणि तोच प्रत्येक गोष्ट करण्यास समर्थ आहे.

(10) १०. आणि ज्या ज्या गोष्टीत तुमचा मतभेद असेल, त्याचा फैसला अल्लाहच्या हाती आहे.१ हाच अल्लाह माझा स्वामी व पालनकर्ता आहे, ज्यावर मी भरवसा ठेवला आहे आणि ज्याच्याकडे मी झुकतो.
(१) या मतभेदाशी अभिप्रेत दीन (धर्म) चा मतभेद होय. उदा. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम वगैरेत आपसात मतभेद आहेत. प्रत्येक धर्माचा मनुष्य हा दावा करतो की त्याचाच धर्म खरा आहे, वस्तुतः सर्व धर्म एकाच वेळी खरे असू शकत नाहीत. सत्य धर्म तर एकच आहे आणि एकच असू शकतो जगात सत्य धर्म आणि सत्य मार्ग ओळखण्याकरिता अल्लाहचा ग्रंथ ‘कुरआन’ अस्तित्वात आहे, परंतु जगातील लोक या ईशवाणीला आपला फैसला करणारा व शासक मानण्यास तयार नाही. शेवटी मग कयामतचाच दिवस बाकी राहतो, ज्या दिवशी अल्लाह या मतभेदाचा फैसला करील आणि सत्यवादी लोकांना जन्नतमध्ये आणि इतरांना जहन्नममध्ये आणि इतरांना जहन्नममध्ये दाखल करील.

(11) ११. तो आकाश आणि धरतीला निर्माण करणारा आहे. त्याने तुमच्यासाठी तुमच्या जाती-प्रकारातून जोड्या बनविल्या आहेत आणि चतुष्पाद प्राण्यांच्याही जोड्या बनविल्या आहेत. तुम्हाला तो त्यात पसरवित आहे, त्याच्यासारखे अन्य काहीही नाही. तो सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे.

(12) १२. आकाशांच्या व धरतीच्या चाव्या त्याच्याच ताब्यात आहेत. ज्याला इच्छितो अमाप रोजी (आजिविका) प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो अपर्याप्त देतो. निःसंशय, तो प्रत्येक गोष्टीचे ज्ञान बाळगणारा आहे.

(13) १३. अल्लाहने तुमच्यासाठी तोच दीन (धर्म) निर्धारित केला आहे, ज्याला कायम करण्याचा आदेश त्याने नूह (अलै.) ला दिला होता, जो (वहयीद्वारे) आम्ही तुमच्याकडे पाठविला आहे आणि ज्याचा खास आदेश आम्ही इब्राहीम आणि मूसा आणि ईसा (अलै.) यांना दिला होता की या दीन (धर्मा) ला कायम राखा आणि यात फूट पाडू नका, ज्या गोष्टीकडे तुम्ही त्यांना बोलावित आहात, ती तर (त्या) अनेकेश्वरवाद्यांना अप्रिय वाटते. अल्लाह ज्याला इच्छितो आपला निवडक (दास) बनवितो आणि जो देखील त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो, तर अशांचे तो यथायोग्य मार्गदर्शन करतो.

(14) १४. आणि त्या लोकांनी आपल्याजवळ ज्ञान येऊन पोहोचल्यानंतर मतभेद केला (केवळ) हट्टापायी आणि जर तुमच्या पालनकर्त्याचे फर्मान एका निर्धारित अवधीपर्यर्ंत आधीपासून निश्चित केले गेले नसते तर त्यांचा फैसला केव्हाच झाला असता आणि ज्यांना, त्यांच्यानंतर ग्रंथ दिला गेला आहे, तेही त्याच्या संबंधाने संशयात पडले आहेत.

(15) १५. तेव्हा तुम्ही त्याच्याचकडे लोकांना बोलवित राहा आणि जे काही तुम्हाला सांगितले गेले आहे, त्यावर दृढतापूर्वक राहा आणि त्यांच्या इच्छा - आकांक्षांचे अनुसरण करू नका आणि सांगा की अल्लाहने जेवढे ग्रंथ अवतरित केले आहेत, मी त्यांच्यावर ईमान राखतो आणि मला आदेश दिला गेला आहे की तुमच्या दरम्यान न्याय-निवाडा करीत राहावे. आमचा आणि तुम्हा सर्वांचा स्वामी व पालनकर्ता अल्लाहच आहे. आमचे आचरण आमच्यासाठी आहे आणि तुमचे आचरण तुमच्यासाठी आहे. आमच्या व तुमच्या दरम्यान कसलाही तंटा नाही, अल्लाह आम्हा सर्वांना एकत्र करील आणि त्याच्याचकडे परतून जायचे आहे.

(16) १६. आणि जे लोक अल्लाहच्या संदर्भात वाद निर्माण करतात, या उपरांत की (सृष्टीने) ते मान्य केले आहे, त्यांचा विवाद अल्लाहच्या निकट खोटा आहे आणि त्यांच्यावर ईश-प्रकोप आहे आणि त्यांच्यासाठी सक्त अज़ाब (शिक्षा - यातना) आहे.

(17) १७. अल्लाहने सत्यासह ग्रंथ अवतरित केला आहे आणि तराजू देखील (अवतरित केला आहे) आणि तुम्हाला काय माहीत की कदाचित कयामत जवळच येऊन ठेपली असेल.

(18) १८. याची घाई त्यांनाच पडली आहे, जे त्यावर ईमान राखत नाहीत आणि जे त्यावर ईमान राखतात, ते त्याचे भय बाळगतात आणि त्यांना ते सत्य असण्याचे पूर्ण ज्ञान आहे. लक्षात ठेवा, जे लोक कयामतविषयी वाद-विवाद करीत आहेत, ते दूरच्या मार्गभ्रष्टतेत जाऊन पडले आहेत.

(19) १९. अल्लाह आपल्या दासांवर मोठा कृपा करणारा आहे, ज्याला इच्छितो अधिक आजिविका (रोजी) प्रदान करतो आणि तो मोठा शक्तिशाली मोठा वर्चस्वशाली आहे.

(20) २०. ज्याचा संकल्प आखिरतच्या शेतीचा असेल तर आम्ही त्याच्या शेतीत आणखी जास्त वाढकरू आणि जो ऐहिक शेतीची इच्छा बाळगत असेल तर आम्ही त्याला त्यातून काही देऊन टाकू, मात्र अशा माणसाचा आखिरतमध्ये कसलाही हिस्सा नाही.

(21) २१. काय त्या लोकांनी (अल्लाहचे) असे सहभागी (निर्धारित केले) आहेत, ज्यांनी असे धार्मिक आदेश निश्चित केले आहेत, जे अल्लाहने फर्माविलेले नाहीत. जर फैसल्याच्या दिवसाचा वायदा नसता तर (याच क्षणी) त्यांचा फैसला केला गेला असता. निःसंशय, त्या अत्याचारींकरिताच दुःखदायक शिक्षा - यातना आहे.

(22) २२. तुम्ही पाहाल की हे अत्याचारी आपल्या दुष्कर्मां (च्या दुष्परिणती) चे भय बाळगत असतील, जे निश्चितच त्यांच्यावर घडून येणार आहे, आणि ज्या लोकांनी ईमान राखले आणि जे सत्कर्मही करीत राहिले तर ते जे काही इच्छितील, त्यांना आपल्या पालनकर्त्याजवळ लाभेल हाच आहे मोठा अनुग्रह.

(23) २३. हेच ते होय, ज्याचा शुभ समाचार अल्लाह त्या दासांना देत आहे ज्यांनी ईमान राखले आणि (पैगंबर आचरणशैलीनुसार) कर्म करीत राहिले, तेव्हा सांगा की मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला इच्छित नाही, परंतु नाते-संबंधाचे प्रेम, आणि जो मनुष्य सत्कर्म करील आम्ही त्याच्या सत्कर्मात आणखी जास्त वाढकरू. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा, मोठा कदर जाणणारा आहे.

(24) २४. काय हे असे सांगतात की (पैगंबराने) अल्लाहविषयी खोटे रचले आहे. अल्लाहने इच्छिले तर तुमच्या हृदयावर मोहर लावील, आणि अल्लाह आपल्या कथनांनी असत्याला मिटवितो आणि सत्याला बाकी राखतो. तो तर छाती (मना) तल्या गुप्त गोष्टीही जाणणारा आहे.

(25) २५. आणि तोच आहे जो आपल्या दासांची तौबा (क्षमा - याचना) कबूल करतो१ आणि अपराधांना क्षमा करतो आणि तुम्ही जे काही करीत आहात, ते सर्व जाणतो.
(१) तौबा (क्षमा - याचना) चा अर्थ अपराधावर पश्चात्ताप करून लज्जित होणे आणि भविष्यात तो गुन्हा न करण्याचा दृढसंकल्प करणे. केवळ तोंडाने तौबा करणे व तो गुन्हा आणि अवज्ञाकारीतेचे कर्म करीत राहणे, आणि तौबाचा देखावा करणे खऱ्या अर्थाने तौबा नव्हे. ही तर तौबाची थट्टा-मस्करी होय. तरी देखील मनापासून केलेली सच्ची तौबा अल्लाह अवश्य कबूल करतो.

(26) २६. आणि ईमान राखणाऱ्यांची व नेक सदाचारी लोकांची (दुआ - प्रार्थना) ऐकतो आणि त्यांना आपल्या कृपेने आणखी जास्त प्रदान करतो, आणि काफिरांसाठी कठोर शिक्षा - यातना आहे.

(27) २७. आणि जर अल्लाहने आपल्या समस्त दासांना विशालतापूर्वक रोजी (आजिविका) दिली असती तर त्यांनी धरतीवर उत्पात (फसाद) माजविला असता, परंतु तो अनुमानाने जे काही इच्छितो अवतरित करतो. तो आपल्या दासांविषयी चांगल्या प्रकारे जाणकार आहे आणि चांगल्या प्रकारे पाहणारा आहे.

(28) २८. आणि तोच होय, जो लोकांचे निराश झाल्यानंतर पर्जन्यवृष्टी करतो. आणि आपल्या दयेला विस्तृत करतो. तोच आहे मित्र- सहाय्यक, आणि श्रेष्ठता व प्रशंसेस पात्र.

(29) २९. आणि त्याच्या निशाण्यांपैकी आकाश व धरतीचे निर्माण करणे, आणि त्यांच्यात सजीवांना पसरविणे होय. तो या गोष्टीसही समर्थ आहे की जेव्हा इच्छिल त्यांना एकत्र करील.

(30) ३०. आणि जे काही संकट तुम्हाला पोहोचते, ते तुमच्या आपल्या हातांच्या दुष्कर्मांचे (फळ) आहे आणि तो बहुतेक गोष्टींना माफ करतो.

(31) ३१. आणि तुम्ही आम्हाला धरतीवर अगतिक (लाचार) करणारे नाहीत. आणि तुमच्यासाठी अल्लाहखेरीज कोणीही मित्र - सहाय्यक नाही आणि ना कोणी मदत करणारा.

(32) ३२. आणि समुद्रात चालणाऱ्या पर्वतांसमान नौका, त्याच्या निशाण्यांपैकी आहेत.

(33) ३३. जर त्याने इच्छिले तर हवा बंद करील आणि या नौका समुद्रात स्थिर थांबतील. निःसंशय, यात प्रत्येक सहनशील, कृतज्ञशील माणसाकरिता निशाण्या आहेत.

(34) ३४. किंवा त्यांना त्यांच्या दुष्कृत्यांपायी नष्ट करून टाकील. तो तर बहुतेक चूका माफ करतो.

(35) ३५. आणि यासाठी की जे लोक आमच्या निशाण्यांबाबत वाद घालतात, त्यांनी जाणून घ्यावे की त्यांच्याकरिता कशाही प्रकारे सुटका नाही.

(36) ३६. तेव्हा तुम्हाला जे काही दिले गेले आहे ते ऐहिक जीवनाची अल्पशी साधन-सामुग्री आहे आणि अल्लाहजवळ जे आहे ते त्यापेक्षा अनेक पटींनी चांगले व बाकी राहणारे आहे. ते त्या लोकांकरिता आहे ज्यांनी ईमान राखले आणि जे केवळ आपल्या पालकनर्त्यावरच भरवसा राखतात.

(37) ३७. आणि ते मोठ्या अपराधांपासून आणि निर्लज्जतेच्या कामांपासून अलिप्त राहतात आणि क्रोधाच्या वेळीही माफ करतात.

(38) ३८. आणि आपल्या पालनकर्त्याचा आदेश स्वीकारतात आणि नमाजला नियमितपणे कायम करतात आणि त्यांचे प्रत्येक काम आपसातील सल्लामसलतीने पार पडते. आणि आम्ही जे काही त्यांना देऊन ठेवले आहे, त्यातून (आमच्या नावाने) देत असतात.

(39) ३९. आणि जेव्हा त्यांच्यावर अत्याचार (व क्रूरता) होते तेव्हा ते केवळ प्रतिशोध घेतात.

(40) ४०. आणि दुचाराचा मोबदला त्याच प्रकारचा दुराचार आहे आणि जो कोणी माफ करील आणि (आपल्या आचरणात) सुधारणा करून घेईल तर त्याचा मोबदला अल्लाहच्या जबाबदारीवर आहे, वस्तुतः अल्लाह अत्याचारींशी प्रेम राखत नाही.

(41) ४१. आणि जो मनुष्य आपल्यावर अत्याचार झाल्यानंतर सूड घेईल तर अशा माणसावर दोषारोप ठेवण्याचा मार्ग नाही.

(42) ४२. (दोषारोपाचा) मार्ग तर अशा लोकांवर आहे, जे स्वतः दुसऱ्यांवर जुलूम अत्याचार करतात आणि धरतीवर नाहक उत्पात (फसाद) माजवित फिरतात. अशाच लोकांकरिता दुःखदायक शिक्षा-यातना (अज़ाब) आहे.

(43) ४३. आणि जो मनुष्य सहनशीलता राखेल आणि माफ करेल तर निःसंशय हे मोठ्या हिंमतीच्या कामांपैकी (एक काम) आहे.

(44) ४४. आणि ज्याला अल्लाह पथभ्रष्ट करील, त्यानंतर त्याचा कोणी मित्र व संरक्षक नाही, आणि तुम्ही पाहाल की अत्याचारी लोक शिक्षा-यातनांना पाहून म्हणत असतील की, परतीचा एखादा मार्ग आहे काय?

(45) ४५. आणि तुम्ही त्यांना पाहाला की ते (जहन्नमच्या) समोर आणून उभे केले जातील. अपमानापायी झुकत जातील, खालच्या नजरेने पाहत असतील. ईमान राखणारे स्पष्टपणे सांगतील की, वस्तुतः तोट्यात राहणारे ते लोक आहेत, ज्यांनी आज कयामतच्या दिवशी स्वतःला आणि आपल्या कुटुंबियांना हानिग्रस्त केले. लक्षात ठेवा की, अत्याचारी लोक निश्चितच कायमस्वरूपी अज़ाबमध्ये आहेत.

(46) ४६. आणि त्यांना कोणी मदत करणारा नसेल, जो अल्लाहव्यतिरिक्त त्यांची मदत करू शकेल आणि ज्याला अल्लाह मार्गापासून हटविल, त्याच्यासाठी कोणताही मार्ग नाही.

(47) ४७. आपल्या पालनकर्त्याचा आदेश मान्य करा, यापूर्वी की अल्लाहतर्फे तो दिवस यावा, ज्याचे टळणे असंभव आहे. तुम्हाला त्या दिवशी ना तर एखादे आश्रयस्थान लाभेल आणि ना लपून अनभिज्ञ बनण्याचे (ठिकाण).

(48) ४८. जर ते तोंड फिरवित असतील तर आम्ही तुम्हाला त्यांच्यावर देखरेख ठेवणारा बनवून पाठविले नाही. तुमचे कर्तव्य केवळ (आमचा) संदेश पोहचविण्याचे आहे. आणि जेव्हा आम्ही माणसाला आपल्या दया-कृपेची गोडी चाखवितो, तेव्हा तो त्यावर शेखी मिरवू लागतो आणि जर त्यांच्यावर, त्यांच्या आचरणामुळे एखादे संकट येते, तेव्हा निश्चितच मनुष्य मोठा कृतघ्न आहे.

(49) ४९. आकाशांची आणि धरतीची राज्यसत्ता अल्लाहकरिताच आहे. तो जे काही इच्छितो, निर्माण करतो, ज्याला इच्छितो कन्या देतो, आणि ज्याला इच्छितो पुत्र देतो.

(50) ५०. किंवा त्यांना पुत्र आणि कन्या दोन्ही मिळून प्रदान करतो, आणि ज्याला इच्छितो निःसंतान ठेवतो, तो मोठा ज्ञान राखणारा आणि सामर्थ्यशाली आहे.

(51) ५१. एखाद्या दासाशी (माणसाशी) अल्लाहने संभाषण करावे हे अशक्य आहे तथापि वहयीच्या स्वरूपात किंवा पडद्यामागून अथवा एखादा फरिश्ता पाठवून, आणि तो अल्लाहच्या आदेशाने, तो जे इच्छिल वहयी करील. निःसंशय तो (अल्लाह) सर्वांत महान आणि हिकमतशाली आहे.

(52) ५२. आणि याच प्रकारे आम्ही तुमच्याकडे आपल्या आदेशाने रुह (आत्मा) अवतरित केला आहे. तुम्ही त्यापूर्वी हेही जाणत नव्हते की ग्रंथ आणि ईमान काय आहे? परंतु आम्ही त्यास नूर (दिव्य प्रकाश) बनविले. त्याच्याद्वारे आपल्या दासांपैकी, ज्याला इच्छितो, मार्गदर्शन करतो. निःसंशय तुम्ही सत्य मार्ग दाखवित आहात.

(53) ५३. त्या अल्लाहच्या मार्गाचे ज्याच्या स्वामीत्वात आकाशांची आणि धरतीची प्रत्येक वस्तू आहे. खबरदार असा, समस्त कार्ये - अल्लाहकडेच परततात.