92 - Al-Lail ()

|

(1) १. शपथ आहे रात्रीची जेव्हा ती पसरते.

(2) २. आणि शपथ आहे दिवसाची जेव्हा तो प्रकाशमान होतो.

(3) ३. आणि शपथ आहे त्याची ज्याने नर व मादी निर्माण केले.

(4) ४. निःसंशय, तुमचे प्रयत्न वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.

(5) ५. तर जो (अल्लाहच्या मार्गात) देत राहिला आणि भय बाळगत राहिला.

(6) ६. आणि भलाईपूर्ण गोष्टीचे सत्य-समर्थन करीत राहिला.

(7) ७. तर आम्हीही त्याला सहज सुलभता प्रदान करू.

(8) ८. परंतु ज्याने कंजूसी केली आणि बेपर्वाई दाखविली.

(9) ९. आणि सत्कर्माच्या गोष्टींना खोटे ठरविले.

(10) १०. तर आम्हीही त्याच्यासाठी तंगी अडचणीची सामुग्री उपलब्ध करू.

(11) ११. त्याची धन-संपत्ती त्याला (तोंडघशी) पडतेवेळी काहीच उपयोगी पडणार नाही.

(12) १२. निःसंशय, मार्ग दाखविण्याची जबाबदारी आमची आहे.

(13) १३. आणि आमच्याच हाती आखिरत आणि ही दुनिया आहे.

(14) १४. मी तर तुम्हाला अंगारे(निखारे) मारणाऱ्या आगीपासून भयभीत केले आहे.

(15) १५. जिच्यात फक्त तोच कमनशिबी दाखल होईल.

(16) १६. ज्याने खोटे ठरविले आणि (याचे अनुसरण करण्यापासून) तोंड फिरविले.

(17) १७. आणि या (आगी) पासून असा मनुष्य दूर ठेवला जाईल, जो अल्लाहचे मोठे भय राखून वागणारा असेल.

(18) १८. जो स्वच्छ शुद्धता (पाकी) प्राप्त करण्यासाठी आपले धन देतो.

(19) १९. कोणाचा त्याच्यावर काही उपकार नाही की ज्याची फेड केली जात असावी.

(20) २०. किंबहुना, केवळ आपल्या अतिउच्च व सर्वश्रेष्ठ पालनकर्त्याची प्रसन्नता प्राप्त करण्याकरिता.

(21) २१. निःसंशय, तो (अल्लाह देखील) लवकरच राजी होईल.