9 - At-Tawba ()

|

(1) १. ही अल्लाह आणि त्याच्या पैगंबरातर्फे वचनमुक्तीची घोषणा आहे त्या अनेकेश्वरवाद्यांबाबत, ज्यांच्याशी तुम्ही वचन करार केला आहे.

(2) २. तेव्हा (हे अनेकेश्वरवाद्यांनो!) तुम्ही देशात चार महिने प्रवास करून घ्या आणि जाणून घ्या की तुम्ही अल्लाहला विवश करू शकत नाही आणि अल्लाह इन्कारी लोकांना अपमानित करणार आहे.

(3) ३. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरातर्फे हज अकबर (मोठ्या हज) च्या दिवशी१ साफ ऐलान आहे की अल्लाह अनेकेश्वरवाद्यांपासून विभक्त आहेत आणि त्याचा पैगंबरदेखील. जर अत्ताही तुम्ही तौबा (क्षमा-याचना) कराल तर तुमच्यासाठी अधिक चांगले आहे आणि जर तुम्ही तोंड फिरवाल, तर जाणून असा की तुम्ही अल्लाहला अगतिक करू शकत नाही आणि काफिरांना सक्त शिक्षेची खबर द्या.
(१) सहीहैन (बुखारी व मुस्लिम) आणि अन्य सहीह-ग्रंथाद्वारे सिद्ध आहे की हज अकबरच्या दिवसापासून अर्थात १० जिलहिज्जाचा दिवस आहे (तिर्मिजी नं. ९५७, बुखारी नं. ४६५५, मुस्लिम नं. ९८२) त्याच दिवशी मिना या ठिकाणी मुक्तीची घोषणा केली गेली. १० जिलहिज्जाला हज अकबर अशासाठी म्हटले जाते की या दिवशी हजला सर्वांत जास्त आणि खास धार्मिक पद्धतीने पार पाडले जाते. सर्वसामान्य लोक उमराला हज असगर म्हणत, यास्तव उमरापेक्षा चांगले करण्यासाठी हजला मोठे हज म्हटले गेले. लोकांमध्ये जे प्रचलित आहे की हज जुमा (शुक्रवार) च्या दिवशी आल्यास हज अकबर आहे अगदी निराधार आहे.

(4) ४. परंतु असे अनेकेश्वरवादी, ज्यांच्याशी तुम्ही वचन करार केलेला आहे आणि त्यांनी तुम्हाला किंचितही नुकसान पोहचविले नाही, आणि तुमच्या विरोधात कोणाची मदत केली नाही, तर तुम्हीदेखील कराराचा अवधी त्यांच्यासह पूर्ण करा. निःसंशय अल्लाह भय राखून वागणाऱ्यांशी प्रेम करतो.

(5) ५. मग आदरणीय महिने संपताच अनेकेश्वरवाद्यांना, आढळतील तिथे ठार करा, त्यांना कैदी बनवा, त्यांना घेरा टाका आणि प्रत्येक घाताच्या ठिकाणी त्यांच्यावर टपून बसा परंतु जर ते तौबा (क्षमा याचना) करून घेतील आणि नित्यनेमाने नमाज पढू लागतील आणि जकात अदा करू लागतील तर तुम्ही त्यांचा मार्ग सोडून द्या. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करणारा, दया करणारा आहे.

(6) ६. जर अनेकेश्वरवाद्यांपैकी कोणी तुमच्या जवळ आश्रय मागेल तर तुम्ही त्याला आश्रय द्या, येथपर्यंत की त्याने अल्लाहची वाणी ऐकून घ्यावी, मग त्याला त्याच्या शांती-स्थळापर्यंत पोहचवा. हे अशासाठी की ते लोक अजाण आहेत.

(7) ७. अनेकेश्वरवाद्यांचा वायदा अल्लाह आणि त्याच्या पैगंबराशी कसा काय राहू शकतो, त्यांच्याखेरीज, ज्यांच्याशी तुम्ही मसजिदे हरामजवळ वचन करार केला आहे, तर जोपर्यंत ते लोक तुमच्याशी करार-पालन करतील, तुम्हीही त्यांच्याशी केलेल्या वायद्यावर कायम राहा. सर्वश्रेष्ठ अल्लाह, भय राखून वागणाऱ्या लोकांशी प्रेम राखतो.

(8) ८. त्यांच्या वचन-वायद्यांचा काय भरोसा? त्यांना जर तुमच्यावर वर्चस्व लाभले तर ते ना नातेसंबंधाचा विचार करतील, ना वचन-कराराचा. आपल्या मुखाने हे तुम्हाला रिझवित आहेत, परंतु यांची मने मानत नाहीत आणि त्यांच्यात अधिकांश लोक फासिक (दुराचारी) आहेत.

(9) ९. त्यांनी अल्लाहच्या आयतींना फार कमी किमतीत विकले, आणि त्याच्या मार्गापासून रोखले. मोठे वाईट आहे, जे हे करीत आहेत.

(10) १०. हे तर एखाद्या ईमानधारकाच्या हक्कात कसल्याही नात्याची किंवा वचनाची काळजी करीत नाही. हे आहेतच हद्द ओलांडून जाणारे.

(11) ११. अजूनही जर ते तौबा (पश्चात्तापयुक्त क्षमा याचना) करतील आणि नमाज नियमितपणे पढू लागतील आणि जकात देत राहतील तर तुमचे धर्म-बांधव आहेत आणि आम्ही तर समंजस लोकांसाठी आपल्या आयतींचे तपशीलपूर्वक निवेदन करीत आहोत.

(12) १२. जर हे लोक वचन-वायद्यानंतरही आपल्या वचनाचा भंग करतील आणि तुमच्या धर्माची निंदा-नालस्तीही करतील तर तुम्हीही अशा काफिरांच्या सरदारांशी भिडा. त्यांची शपथ काहीच नाही. संभवतः अशा प्रकारे ते (असे करणे) थांबवतील.

(13) १३. तुम्ही त्या लोकांची डोकी ठेचण्यासाठी का तयार होत नाही, ज्यांनी आपल्या शपथा तोडून टाकल्या आणि (अंतिम) पैगंबराला देशाबाहेर घालविण्याच्या विचारात आहे, आणि स्वतःच पहिल्यांदा त्यांनी तुमची छेड काढली आहे. काय तुम्ही त्यांना भिता? वस्तुतः अल्लाहलाच सर्वांत जास्त हक्क आहे की तुम्ही त्याचे भय राखावे, जर तुम्ही ईमानधारक असाल.

(14) १४. तुम्ही त्यांच्याशी युद्ध करा. अल्लाह तुमच्या हस्ते त्यांना दुःख यातना देईल, त्यांना अपमानित करील. त्यांच्या विरोधात तुमची मदत करील आणि ईमानधारकांच्या हृदयांना शितलता पोहचवील.

(15) १५. आणि त्यांच्या मनाचे दुःख आणि क्रोध दूर करील आणि अल्लाह ज्याच्याकडे इच्छितो दया कृपेने ध्यान देतो आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह जाणणारा, हिकमतशाली आहे.

(16) १६. काय तुम्ही हे समजून बसला आहात की तुम्हाला असेच सोडून दिले जाईल? अद्याप सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुमच्यापैकी त्यांना उघडकीस आणले नाही, जे जिहादचे सैनिक आहेत, आणि ज्यांनी अल्लाह, त्याचा रसूल आणि ईमानधारकांखेरीज कोणालाही मित्र बनविले नाही, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह खूप चांगल्या प्रकारे जाणतो, जे तुम्ही करीत आहात.

(17) १७. शक्य नव्हे की अनेकेश्वरवादी, अल्लाहच्या मस्जिदीला आबाद करतील, वास्तविक स्थिती ही आहे की हे आपल्या इन्काराचे स्वतः साक्षी आहेत. त्यांची सर्व कर्मे वाया गेलीत आणि ते नेहमीकरिता जहन्नममध्ये राहतील.

(18) १८. अल्लाहच्या मस्जिदीना तर ते लोक आबाद करतात, जे अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखतील, नमाज नियमित पढतील, जकात देतील आणि अल्लाहशिवाय कोणालाही भित नसतील. संभवतः हेच लोक खात्रीने मार्गदर्शन लाभलेले आहेत.

(19) १९. काय तुम्ही हाजी लोकांना पाणी पाजणे आणि मस्जीदे हराम (काबागृह) ची सेवा करणे, त्याच्यासमान ठरविले आहे, जो अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखील आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद (संघर्ष) करील. हे अल्लाहजवळ समान नाही१ आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अत्याचारी लोकांना मार्ग दाखवित नाही.
(१) अनेकेश्वरवादी हजयात्रींना पाणी पाजण्याचे आणि आदरणीय मसजिद (काबागृह) च्या देखरेखीचे जे काम करीत, त्याबद्दल त्यांना मोठी घमेंड होती, आणि याच्या तुलनेत ते ईमान व जिहादला श्रेष्ठ जाणत नसत, ज्याची श्रेष्ठता ईमानधारकांमध्ये होती, यास्तव अल्लाहने फर्माविले, काय तुम्ही हजयात्रींना पाणी पाजणे व मसजिदे हरामची व्यवस्था राखणे ही गोष्ट अल्लाहवर ईमान राखणे आणि अल्लाहच्या मार्गात जिहाद करण्यासमान समजता? लक्षात ठेवा, अल्लाहच्या ठिकाणी या दोन गोष्टी समान नाहीत, किंबहुना अनेक ईश्वरांची उपासना करणाऱ्यांचे कोणतेही कर्म स्विकार्य नाही, मग ते कर्म वरवर पाहता कितीही पुण्यकारक का असेना.

(20) २०. ज्या लोकांनी ईमान राखले, देशत्याग केला, अल्लाहच्या मार्गात आपल्या धनाने व प्राणाने संघर्ष केला, ते अल्लाहच्या समोर खूप मोठ्या दर्जाचे आहेत आणि हेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत.

(21) २१. त्यांचा पालनकर्ता त्यांना आपली दया आणि प्रसन्नता आणि अशा जन्नतींची खूशखबर देतो, ज्यांच्यात त्यांच्यासाठी निरंतर सुख आहे.

(22) २२. तिथे ते सदैवकाळ राहतील अल्लाहच्या निकट, निःसंशय हा फार मोठा मोबदला आहे.

(23) २३. हे ईमान राखणाऱ्यांनो! आपल्या पित्यांना आणि आपल्या बांधवांना मित्र बनवू नका, जर ते कुप्र (इन्कारा) ला ईमानापेक्षा जास्त चांगले समजतील. तुमच्यापैकी जोदेखील त्यांच्याशी दोस्ती ठेवील, तो पूर्णपणे (अपराधी आणि) अत्याचारी आहे.

(24) २४. तुम्ही सांगा की जर तुमचे पिता, तुमचे पुत्र आणि तुमचे बांधव आणि तुमच्या पत्न्या आणि तुमचे कुटुंब आणि कमविलेले धन आणि तो व्यापार, ज्याच्या कमतरतेचे तुम्ही भय राखता आणि ती घरे, जी तुम्हाला फार प्रिय आहेत (जर) हे सर्व तुम्हाला अल्लाह आणि त्याचा पैगंबर आणि अल्लाहच्या मार्गात जिहादपेक्षा जास्त प्रिय आहे तर मग प्रतिक्षा करा की सर्वश्रेष्ठ अल्लाहने आपला अज़ाब (शिक्षा-यातना) आणावी. सर्वश्रेष्ठ अल्लाह दुराचारी लोकांना मार्ग दाखवत नाही.

(25) २५. निःसंशय, सर्वश्रेष्ठ अल्लाहने तुम्हाला अनेक युद्धभूमीत विजय प्रदान केला आहे आणि हुनैन-युद्धाच्या दिवशीही, जेव्हा तुम्हाला आपल्या जास्त संख्येबद्दल घमेंड होती, परंतु अशाने तुम्हाला काहीच लाभ झाला नाही, तथापि धरती आपली विशालता (बाळगत) असतानाही तुमच्यासाठी संकुचित (तंग) झाली, मग तुम्ही पाठ फिरवून दूर पळाले.

(26) २६. मग अल्लाहने आपल्यातर्फे सलामती आपल्या पैगंबरावर आणि ईमानधारकांवर अवतरित केली आणि आपले ते सैन्य पाठविले जे तुम्ही पाहत नव्हते आणि काफिरांना (इन्कारी लोकांना) पूर्ण शिक्षा दिली आणि या काफिरांचा हाच मोबदला होता.

(27) २७. मग त्यानंतरही ज्याला इच्छिल, सर्वश्रेष्ठ अल्लाह माफ करील आणि अल्लाहच माफ करणारा दया करणारा आहे.

(28) २८. हे ईमान राखणाऱ्यांनो! निःसंशय अनेकेश्वरवादी नापाक (अस्वच्छ अशुद्ध) आहेत.१ ज्यांनी या वर्षानंतर मसजिदे हराम (आदरणीय मसजिद-काबागृहा) च्या जवळही येता कामा नये जर तुम्हाला गरीबीचे भय असेल तर अल्लाह तुम्हाला आपल्या दया कृपेने धनवान करील जर अल्लाह इच्छिल. निःसंशय अल्लाह सर्वज्ञ आणि हिकमतशाली आहे.
(१) अनेक ईश्वरांची भक्ती आराधना करणाऱ्यांचे नापाक (अस्वच्छ अशुद्ध) असण्याचा अर्थ श्रद्धा, ईमान आणि कर्मांची अस्वच्छता व अशुद्धता होय. काहींच्या मते हे अंतर्बाह्यरित्या नापाक आहेत, कारण ते मल-मुत्र त्याग करताना स्वच्छता व पावित्र्याचा या प्रकारे इतमाम राखत नाही ज्याबाबतचा आदेश धार्मिक नियमांद्वारे दिला गेला आहे.

(29) २९. त्या लोकांशी लढा जे अल्लाहवर आणि आखिरतवर ईमान राखत नाही. जे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराद्वारे हराम ठरविलेल्या वस्तूला हराम समजत नाही, ना ते सत्य-धर्माचा स्वीकार करतात. त्या लोकांपैकी ज्यांना ग्रंथ प्रदान केला गेला आहे, येथपर्यंत की त्यांनी अपमानित होऊन स्वहस्ते जिजिया (टॅक्स) अदा करावा.

(30) ३०. यहूदी म्हणतात की उज़ैर अल्लाहचा पुत्र आहे आणि ख्रिस्ती म्हणतात की मसीह अल्लाहचा पुत्र आहे, हे कथन फक्त त्यांच्या तोंडची गोष्ट आहे. पूर्वीच्या काफिरांच्या कथनाची हेदेखील बरोबरी करू लागले आहेत. अल्लाह सर्वनाश करो यांचा, हे कोठे भरकटत चालले आहेत?

(31) ३१. त्या लोकांनी अल्लाहला सोडून आपल्या धर्म-ज्ञानी आणि धर्माचार्यांना रब (स्वामी, पालनहार) बनविले आहे, आणि मरियमपुत्र मसीहला वास्तविक त्यांना एकमेव अल्लाहचीच उपासना करण्याचा आदेश दिला गेला होता, ज्याच्याखेरीज कोणीही उपासना-योग्य नाही तो त्यांच्या शिर्क करण्यापासून पवित्र (पाक) आहे.

(32) ३२. ते अल्लाहच्या दिव्य प्रकाशाला आपल्या तोंडांनी विझवू इच्छितात आणि अल्लाह इन्कार करतो, परंतु हे की आपल्या दिव्य प्रकाशाला पूर्णत्वास पोहचवावे, मग काफिरांना कितीही अप्रिय वाटो.१
(१) अर्थात अल्लाहचे पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना जो दिव्य प्रकाश आणि सत्य धर्म देऊन पाठविले आहे. यहूदी, ख्रिस्ती आणि अनेकेश्वरवादी इच्छितात की त्याला भांडण आणि आरोपांद्वारे मिटवून टाकावे, त्याचे उदाहरण असेच आहे, जणू एखाद्याने फूंक मारून सूर्य-चंद्राचा प्रकाश विझविण्याचा प्रयत्न करावा. हे जसे अशक्य आहे, तसेच अल्लाहने आपल्या पैगंबरासह पाठविलेल्या सत्य धर्माला मिटविणे अशक्य आहे. तो समस्त धर्मांवर वर्चस्व राखील, जसे अल्लाहने पुढच्या आयतीत फर्माविले. काफिरचा शाब्दिक अर्थ लपविणारा असा आहे. या अनुषंगाने रात्रीलाही काफिर म्हणतात कारण तो सर्व चीज वस्तूंना आपल्या अंधारात लपवितो. शेतकऱ्यालाही काफिर म्हणतात, कारण तो धान्याचे दाणे जमिनीत लपवितो यास्तव काफिरदेखील अल्लाहचे दिव्य तेज लपवू इच्छितात किंवा आपल्या मनात इन्कार, कट-कारस्थान आणि ईमानधारकांच्या व इस्लामच्या विरूद्ध द्वेष मत्सर लपवून आहेत. याच कारणाने त्यांना ‘काफिर’ म्हटले जाते.

(33) ३३. त्यानेच आपल्या पैगंबराला सच्चा मार्ग आणि सत्य धर्मासह पाठविले की त्याला इतर सर्व धर्मांवर वर्चस्वशाली करावे, मन अनेकेश्वरवादी लोकांना कितीही वाईट वाटो.

(34) ३४. हे ईमान राखणाऱ्यांनो! बहुतेक धर्म-ज्ञानी आणि उपासक, लोकांचा माल नाहक गिळंकृत करतात आणि अल्लाहच्या मार्गापासून रोखतात आणि जे लोक सोने-चांदीचे खजिने बाळगतात आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करीत नाही, त्यांना कठोर शिक्षा-यातनेची खबर ऐकवा.

(35) ३५. ज्या दिवशी त्या खजिन्याला जहन्नमच्या आगीत तापविले जाईल, मग त्याद्वारे त्यांचे कपाळ आणि कूस- बगल आणि पाठींना डागले जाईल (त्यांना सांगितले जाईल) हेच ते, ज्याला तुम्ही आपल्यासाठी जमवून ठेवले होते, तर आपल्या या साठवून ठेवलेल्या खजिन्यांची गोडी चाखा.

(36) ३६. महिन्यांची गणना अल्लाहच्या जवळ, अल्लाहच्या ग्रंथात बारा आहे, त्याच दिवसापासून, जेव्हापासून आकाशांना आणि जमिनीला त्याने निर्माण केले आहे. त्यांच्यापैकी चार महिने आदर आणि प्रतिष्ठेचे आहेत. हाच पवित्र धर्म आहे. तुम्ही या महिन्यांच्या काळात आपल्या प्राणांवर अत्याचार करू नका आणि तु्‌ही सर्व अनेकेश्वरवाद्यांशी जिहाद करा जसे ते तुम्हा सर्वांशी लढतात आणि लक्षात ठेवा की अल्लाह भय राखून कर्म करणाऱ्यांच्या सोबत आहे.

(37) ३७. महिन्यांना पुढे मागे करणे, कुप्र (अधर्म) ला वाढविणे आहे. त्याद्वारे त्यांना मार्गभ्रष्ट केले जाते, जे काफिर आहेत, एका वर्षाला हलाल करून घेतात आणि एका वर्षाला हराम ठरवितात की अल्लाहने जे हराम ठरविले आहे, त्याच्या गणनेत बरोबरीने करून घ्यावे, मग ज्याला हराम केले आहे, त्याला हलाल ठरवावे. त्यांची वाईट कर्मे त्यांना चांगली दाखविली गेली आहेत आणि अल्लाह काफिरांना मार्गदर्शन करीत नाही.

(38) ३८. हे ईमान राखणाऱ्यांनो! तुम्हाला झाले तरी काय की जेव्हा तुम्हाला सांगितले जाते की चला, अल्लाहच्या मार्गात देशत्याग करा, तर तुम्ही जमिनीला बिलगता. काय तुम्ही आखिरतऐवजी ऐहिक जीवनावर राजी झालात? ऐका या जगाचे जीवन आखिरतच्या तुलनेत अतिशय लहान आहे.

(39) ३९. जर तुम्ही देशत्याग (हिजरत) केला नाही तर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला दुःखदायक शिक्षा देईल आणि तुमच्याखेरीज दुसऱ्या लोकांना बदलून आणील. तुम्ही सर्वश्रेष्ठ अल्लाहला कोणतेही नुकसान पोहचवू शकत नाही आणि अल्लाह सर्व काही करण्यास समर्थ आहे.

(40) ४०. जर तुम्ही पैगंबर (मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) ची मदत न कराल तर अल्लाहनेच त्यांची मदत केली अशा वेळी जेव्हा काफिर लोकांनी त्यांना (देशा) बाहेर घालविले होते. दोनपैकी दुसरा जेव्हा ते दोघे गुफेत होते, जेव्हा ते आपल्या साथीदारास सांगत होते, चिंता करू नका अल्लाह आमच्या सोबत आहे. तेव्हा अल्लाहनेच आपल्यातर्फे शांती-समाधान उतरवून अशा सैन्यांद्वारे त्यांना मदत पोहचिवली, ज्यांना तुम्ही पाहिलेसुद्धा नाही. त्याने काफिरांचा बोल खाली पाडला आणि मोठा व उत्तम बोल तर अल्लाहचाच आहे. सर्वश्रेष्ठ अल्लाह वर्चस्वशाली आणि हिकमत बाळगणारा आहे.

(41) ४१. निघा, उठा हलक्या अवस्थेत असाल तरीही आणि भारी अवजड असाल तरीही आणि अल्लाहच्या मार्गात आपल्या तन-मन-धनाने जिहाद करा. हेच तुमच्याकरिता चांगले आहे जर तुम्ही जाणत असाल.

(42) ४२. जर त्वरित प्राप्त होणारी धन-संपदा असती, आणि हलकासा प्रवास असता तर हे अवश्य तुमच्या मागे निघाले असते, परंतु त्यांना तर लांब अंतराचा प्रवास मोठा कठीण वाटला आणि आता तर हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतील की आमच्या अंगी जर शक्ती-सामर्थ्य राहिले असते तर आम्ही अवश्य तुमच्यासोबत निघालो असतो. ते आपल्या प्राणांना स्वतःच विनाशाकडे नेत आहेत. त्यांच्या खोटेपणाचे खरे ज्ञान अल्लाहला आहे.

(43) ४३. अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तुम्ही त्यांना परवानगी का दिली, याविना की तुमच्या समोर सच्चे व प्रामाणिक लोक स्पष्टपणे जाहीर व्हावेत आणि तुम्ही खोट्या लोकांनाही जाणून घ्यावे.

(44) ४४. अल्लाहवर आणि कयामत (प्रलया) च्या दिवसावर ईमान आणि दृढ विश्वास राखणारे लोक तर धनाने व प्राणाने जिहाद करण्यापासून थांबून राहण्याची परवानगी तुमच्याकडे कधीही मागणार नाहीत आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह, दुष्कर्मांपासून दूर राहणाऱ्या लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.

(45) ४५. ही परवानगी तर तुमच्याजवळ तेच लोक मागतात, ज्यांचे ना अल्लाहवर ईमान आहे, ना आखिरच्या दिवसावर अटळ विश्वास आहे, ज्यांची मने संशयग्रस्त आहेत आणि ते आपल्या संशयातच भटकत आहेत.

(46) ४६. जर त्यांचा इरादा (जिहादकरिता) निघण्याचा असता तर त्यांनी या प्रवासाकरिता साधनांची तयारी केली असती, परंतु अल्लाहला त्यांचे उठणे प्रिय नव्हते, यास्तव त्यांनी काही करण्यापासून रोखले आणि त्यांना सांगितले गेले की तुम्ही बसून राहणाऱ्यांसोबत बसूनच राहा.

(47) ४७. जर हे तुमच्याच सोबत निघालेही असते तर तुमच्यासाठी उपद्रवाखेरीज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची वाढ केली नसती, किंबहुना तुमच्या दरम्यान उत्पात माजविण्यासाठी धावपळ केली असती आणि तुमच्यात फूट पाडण्याची संधी शोधत राहिले असते, त्यांना मानणारे स्वतः तुमच्यात हजर आहेत आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अत्याचारी लोकांना चांगल्या प्रकारे जाणतो.

(48) ४८. हे तर यापूर्वीही फूट पाडण्याची संधी शोधत राहिले आणि तुमच्यासाठी कार्यात उलटफेर करीत राहिले, येथपर्यंत की सत्य घेऊन पोहोचले आणि अल्लाहचा आदेश प्रभावी झाला, तरीदेखील ते लोक वाईट मानतच राहिले.

(49) ४९. त्यांच्यापैकी कोणी म्हणतो की मला आदेश द्या, मला संकटात टाकू नका. जाणून असा की ते संकटग्रस्त झाले आहेत आणि निःसंशय जहन्नम काफिरांना घेरून टाकणारी आहे.

(50) ५०. तुम्हाला जर एखादी भलाई प्राप्त झाली तर त्यांना वाईट वाटते, आणि जर कष्ट यातना पोहोचली तर म्हणतात, आम्ही तर आपली व्यवस्था पहिल्यापासून ठीकठाक करून घेतली होती, मग खूप तोऱ्याने ऐट दाखवित परत जातात.

(51) ५१. तुम्ही सांगा, आम्हाला त्याखेरीज कोणतीही गोष्ट पोहोचू शकत नाही, जी अल्लाहने आमच्यासाठी लिहून ठेवली आहे. तो आमचा स्वामी आहे आणि (तुम्ही सांगा) ईमानधारकांनी अल्लाहवरच पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे.

(52) ५२. तुम्ही सांगा, तुम्ही आमच्याबाबत ज्या गोष्टींच्या प्रतिक्षेत आहात, ती दोन चांगल्या गोष्टींपैकी एक आहे आणि आम्ही तुमच्याबाबत या गोष्टीच्या प्रतिक्षेत आहोत की एकतर अल्लाहने तुम्हाला आपल्यातर्फे एखादी शिक्षा द्यावी किंवा आमच्या हातून, तेव्हा एका बाजूला तुम्ही प्रतिक्षा करा, दुसऱ्या बाजूला आम्ही तुमच्यासोबत प्रतिक्षा करीत आहोत.

(53) ५३. तुम्ही सांगा की तुम्ही खुशीने खर्च करा किंवा नाखुशीने, कबूल तर कधीही केला जाणार नाही. निःसंशय तुम्ही दुराचारी लोक आहात.

(54) ५४. त्यांचे खर्च करणे कबूल न होण्याचे कारण याखेरीज कोणतेही नाही की हे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे अवज्ञाकारी आहेत आणि मोठ्या सुस्तीने नमाजला येतात आणि वाईट मनाने खर्च करतात.

(55) ५५. यास्तव त्यांची धन-संपत्ती आणि संततीने तुम्हाला आश्चर्यात टाकू नये. अल्लाह हेच इच्छितो की त्यांना या जगाच्या जीवनातच शिक्षा द्यावी आणि त्यांच्या इन्कार करण्याच्या अवस्थेतच त्यांचा प्राण निघावा.

(56) ५६. आणि हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की हे तुमच्या गटाचे लोक आहेत, वास्तविक ते तुमच्या गटाचे नाहीत, गोष्ट केवळ एवढीच की हे भित्रे लोक आहेत.

(57) ५७. जर यांना एखादे सुरक्षित स्थान किंवा एखादी गुफा किंवा कोणतीही घुसून बसण्याची जागा मिळाली तर लगेच धाव घेत पळत सुटतील.

(58) ५८. त्यांच्यात तेदेखील आहेत, जे दानाच्या धनाच्या वाटणीबाबत तुमच्यावर आरोप ठेवतात, जर त्यातून त्यांना मिळाल्यास आनंद होतो आणि जर त्यातून काही न मिळाले तर त्वरित नाराज होऊ लागतात.

(59) ५९. जर हे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरानी दिलेल्यावर खूश राहिले असते आणि म्हणाले असते की अल्लाह आम्हाला पुरेसा आहे, अल्लाह आपल्या कृपेने आम्हाला देईल आणि त्याचा पैगंबरही. आम्ही तर अल्लाहकडूनच अपेक्षा राखणारे आहोत.

(60) ६०. दान केवळ फकीरांकरिता आहे आणि गरीबांकरिता आणि त्यांचे काम करणाऱ्यांकरिता आणि त्या लोकांकरिता ज्यांची मनधरणी केली जात असेल आणि गुलाम मुक्त करण्याकरिता आणि कर्जदार लोकांकरिता, आणि अल्लाहच्या मार्गात आणि प्रवाशांकरिता, अनिवार्य कर्तव्य आहे अल्लाहतर्फे आणि अल्लाह सर्वज्ञ हिकमतशाली आहे.

(61) ६१. आणि त्यांच्यात असेदेखील आहेत, जे पैगंबराला दुःख यातना पोहचवितात आणि म्हणतात की हलक्या कानाचा आहे (तुम्ही) सांगा, की तो कान तुमच्या भलाईसाठी आहे. तो अल्लाहवर ईमान राखतो आणि ईमानधारकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्यापैकी जे ईमानधारक आहेत, हे त्यांच्यासाठी दया कृपा आहेत आणि अल्लाहचे रसूल यांना जे लोक दुःख यातना पोहचवितात, त्यांच्यासाठी दुःखदायक अज़ाब (शिक्षा-यातना) आहे.

(62) ६२. ते केवळ तुम्हाला खूश करण्यासाठी तुमच्यासमोर अल्लाहची शपथ घेतात, वस्तुतः हे ईमान राखणारे असते तर अल्लाह आणि त्याचे रसूल (पैगंबर) खूश केले जाण्यास अधिक पात्र होते.

(63) ६३. काय हे नाही जाणत की जो कोणी अल्लाहचा आणि त्याच्या पैगंबराचा विरोध करील, त्याच्यासाठी निश्चितच जहन्नमची आग आहे, जिच्यात ते नेहमी राहतील. हा फार मोठा अपमान आहे.

(64) ६४. मुनाफिक लोकांना अर्थात ढोंगी मुसलमानांना (नेहमी) हे भय वाटत असते की कदाचित त्यांच्यावर (ईमानधारकांवर) एखादी आयत न अवतरित व्हावी, जी त्यांच्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगून टाकील. तुम्ही सांगा की तुम्ही थट्टा मस्करी करीत राहा. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह ते जाहीर करणारा आहे, ज्यापासून तुम्ही भयभीत आहात.

(65) ६५. जर तुम्ही विचाराल तर साफ म्हणतील की आम्ही तर असेच आपसात थट्टा विनोद करीत होतो. त्यांना सांगा की काय अल्लाह त्याच्या आयती आणि त्याचा रसूल एवढेच तुमच्या थट्टा-मस्करीकरिता बाकी राहिलेत?

(66) ६६. तुम्ही बहाणे बनवू नका. निःसंशय तुम्ही आपल्या ईमान राखल्यानंतर काफिर (इन्कारी) झाले. जर आम्ही तुमच्यापैकी काही लोकांना माफ जरी केले तरी काही लोकांना त्यांच्या अत्याचाराची सक्त सजा देणारच.

(67) ६७. सर्वच मुनाफिक (दांभिक) पुरुष आणि स्त्रिया आपसात सारखेच आहेत. ते वाईट गोष्टींचा आदेश देतात आणि भल्या गोष्टींपासून रोखतात आणि आपली मूठ बंद ठेवतात, हे अल्लाहला विसरले, अल्लाहनेही त्यांचा विसर पाडला. निःसंशय मुनाफिक (दुतोंडी) लोकच दुराचारी आहेत.

(68) ६८. सर्वश्रेष्ठ अल्लाहने या मुनाफिक पुरुष-स्त्रियांशी आणि काफिरांशी जहन्नमच्या आगीचा वायदा केलेला आहे, जिथे ते नेहमी राहतील तेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. त्यांचा अल्लाहतर्फे धिःक्कार आहे आणि त्यांच्यासाठी कायमस्वरूपी शिक्षा यातना आहे.

(69) ६९. तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांप्रमाणे, जे तुमच्यापेक्षा शूर आणि धन-संपत्ती व संतती जास्त बाळगत होते, तर त्यांनी आपला धार्मिक भाग उचलला, मग तुम्हीही आपला हिस्सा उचलत आहात. ज्याप्रमाणे तुमच्यापूर्वीचे लोक आपल्या हिश्यांद्वारे लाभान्वित झाले आणि तुम्हीदेखील त्याचप्रमाणे मस्करीची गोष्ट केली, जशी त्यांनी केली होती. त्यांची कर्मे या जगात आणि आखिरतमध्ये वाया गेलीत आणि हेच लोक तोट्यात आहेत.

(70) ७०. काय त्यांना आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांची खबर नाही पोहोचली? नूह आणि आद आणि समूदचे जनसमूह आणि इब्राहीमचा जनसमूह आणि मदयनचे रहिवाशी आणि उलटून पालथ्या घातलेल्या वस्त्यांच्या लोकांची. त्यांच्याजवळ पैगंबर स्पष्ट निशाण्या घेऊन पोहोचले तेव्हा सर्वश्रेष्ठ अल्लाह असा नव्हता की त्यांच्यावर अत्याचार करील. उलट त्यांनी स्वतःच आपल्यावर अत्याचार करून घेतला.

(71) ७१. ईमानधारक पुरुष आणि स्त्रिया आपसात एकमेकांचे (सहाय्यक आणि) मित्र आहेत. ते चांगल्या गोष्टींचा आदेश देतात, आणि वाईट गोष्टींपासून रोखतात. नमाज नियमितपणे पढतात. जकात अदा करतात. अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांचे म्हणणे मान्य करतात. अशाच लोकांवर अल्लाह लवकरच दया कृपा करील. निःसंशय अल्लाह वर्चस्वशाली, हिकमत बाळगणारा आहे.

(72) ७२. या ईमानधारक पुरुष आणि स्त्रियांशी अल्लाहने त्या जन्नतींचा वायदा केला आहे, ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत, जिथे ते नेहमीकरिता राहतील, आणि त्या पाक स्वच्छ घराचा, जे त्या अविनाशी जन्नतमध्ये आहे आणि अल्लाहची प्रसन्नता सर्वांत महान आहे. हीच फार मोठी सफलता आहे.

(73) ७३. हे नबी! काफिरांशी आणि मुनाफिक लोकांशी जिहाद करीत राहा आणि त्यांच्यावर सक्ती करा. त्यांचे खरे ठिकाण जहन्नम आहे. जे अतिशय वाईट ठिकाण आहे.

(74) ७४. हे अल्लाहची शपथ घेऊन सांगतात की त्यांनी असे म्हटले नाही. वास्तिवक सत्याचा इन्कार त्यांनी आपल्या तोंडानी केलेला आहे. आणि हे इस्लामचा स्वीकार केल्यानंतरही काफिर झालेत आणि यांनी त्या कामाचा इरादाही केला आहे, ज्याला ते प्राप्त करू शकले नाहीत. हे केवळ याच गोष्टीचा सूड घेत आहेत की त्यांना अल्लाहने आपल्या कृपेने आणि याच्या पैगंबराने धनवान केले जर हे अजूनही तौबा (पश्चात्ताप) करून घेतील तर हे त्यांच्या हक्कात चांगले आहे आणि जर तोंड फिरवतील तर अल्लाह त्यांना या जगात आणि आखिरतमध्ये दुःखदायक शिक्षा देईल आणि संपूर्ण धरतीत त्यांना कोणी मित्र आणि मदत करणारा लाभणार नाही.

(75) ७५. यांच्यात असेदेखील आहेत, ज्यांनी अल्लाहशी वायदा केला होता की जर तो आम्हाला आपल्या कृपेने धन प्रदान करील तर आम्ही अवश्य दान करू आणि पूर्णतः नेक सदाचारी लोकांपैकी होऊ.

(76) ७६. परंतु जेव्हा अल्लाहने आपल्या कृपेने त्यांना दिले तेव्हा हे त्यात कंजूसपणा करू लागले आणि टाळाटाळ करून तोंड फिरविले.

(77) ७७. तेव्हा याची शिक्षा म्हणून अल्लाहने त्यांच्या मनात फूटीरता टाकली अल्लाहच्या भेटीच्या दिवसपर्यंत कारण त्यांनी अल्लाहशी केलेल्या वायद्याचा भंग केला, आणि खोटे बोलत राहिले.

(78) ७८. काय ते हे नाही जाणत की अल्लाहला त्यांच्या मनातला गुप्त भेद आणि त्यांच्या कानगोष्टी सर्व माहीत आहे आणि अल्लाह सर्व लपलेल्या गोष्टींना जाणणारा आहे.

(79) ७९. जे लोक अशा ईमानधारकांवर आरोप ठेवता, जे मोकळ्या मनाने दान करतात आणि त्या लोकांवर, ज्यांना आपल्या मेहनतीखेरीज काहीच साध्य नाही, तर हे त्यांची थट्टा उडवितात, अल्लाहदेखील त्यांची थट्टा उडवितो आणि याच लोकांसाठी मोठी सक्त शिक्षा यातना (अज़ाब) आहे.

(80) ८०. तुम्ही त्यांच्यासाठी तौबा (क्षमा याचना) करा किंवा न करा, जर तुम्ही सत्तर वेळाही यांच्यासाठी तौबा कराल तरीदेखील अल्लाह त्यांना कदापि माफ करणार नाही. कारण त्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार केला आहे आणि अशा दुराचारी लोकांना अल्लाह मार्गदर्शन करीत नाही.

(81) ८१. मागे राहून जाणारे लोक, अल्लाहचे रसूल (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांच्याविरूद्ध आपल्या बसून राहण्यावर खूश आहेत. त्यांनी अल्लाहच्या मार्गात आपल्या धनाने व प्राणाने जिहाद करणे अप्रिय जाणले आणि ते म्हणाले की या भयंकर उन्हात निघू नका. त्यांना सांगा की जहन्नमची आग याहून अतिशय तापदायक आहे. यांनी हे समजून घेतले असेल तर बरे झाले असते.

(82) ८२. तेव्हा त्यांनी हसणे फार कमी आणि रडणे जास्त केले पाहिजे. आपल्या या कृतकर्मांच्या मोबदल्यात.

(83) ८३. तेव्हा जर सर्वश्रेष्ठ अल्लाह तुम्हाला त्याच्या एखाद्या समूहाकडे परतवून नेईल मग हे तुमच्याशी लढाईच्या मैदानात जाण्याची अनुमती मागतील तेव्हा तुम्ही सांगा की तुम्ही माझ्यासोबत कधीही निघू शकत नाही आणि ना माझ्यासह शत्रुशी लढू शकता. तुम्ही पहिल्या खेपेलाच बसून राहणे पसंत केले होते, तेव्हा आताही तुम्ही मागे राहून जाणाऱ्यांमध्येच बसून राहा.

(84) ८४. आणि यांच्यापैकी कोणी मरण पावला तर त्याच्या जनाजाची नमाज तुम्ही कधीही पढू नका आणि ना त्याच्या कबरीवर जाऊन उभे राहा, हे अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा इन्कार करणारे लोक आहेत आणि मरेपर्यंत दुराचारीच राहिले.

(85) ८५. आणि तुम्हाला त्यांची धन-संपत्ती आणि संतती काहीच भली वाटू नये. सर्वश्रेष्ठ अल्लाह हेच इच्छितो की त्यांना या गोष्टीद्वारे या जगात सजा द्यावी आणि हे आपला जीव निघेपर्यंत काफिर (कृतघ्न) च राहिले.

(86) ८६. आणि जेव्हा एखादी सूरह (पवित्र कुरआनातील अध्याय) अवतरित केली जाते की अल्लाहवर ईमान राखा आणि त्याच्या पैगंबरासह मिळून जिहाद करा, तेव्हा त्यांच्यापैकी धनवान लोकांचा एक गट तुमच्याजवळ येऊन अनुमती घेतो की आम्हाला तर बसून राहणाऱ्यांमध्येच सोडून द्या.

(87) ८७. हे तर घरात राहणाऱ्या स्त्रियांना साथ देण्यावर राजी झाले, आणि त्यांच्या हृदयांवर मोहर लावली गेली. आता ते कसलेही समज उमज बाळगत नाही.१
(१) हृदयांवर मोहर लावली जाणे हे सतत अपराध केल्यामुळे होते, ज्याबाबतचे स्पष्टीकरण या आधी केले गेले आहे. अशाने मनुष्य विचार-चिंतन व आकलनाच्या शक्तीपासून वंचित होतो.

(88) ८८. परंतु स्वतः पैगंबर आणि त्यांच्यासोबतचे ईमानधारक आपल्या धनाने व प्राणाने जिहाद करतात. त्यांच्याचसाठी भलाई आहे. आणि हेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत.

(89) ८९. याच लोकांसाठी सर्वश्रेष्ठ अल्लाहने ती जन्नत तयार केली आहे, जिच्याखाली प्रवाह वाहत आहेत. ज्यात ते नेहमी राहतील आणि हीच फार मोठी सफलता आहे. १
(१) ईमानधारक असल्याचे ढोंग करणाऱ्या त्या मुनाफिकांच्या विरूद्ध सच्चा ईमानधारकांचे चारित्र्य असे की तन मन धनाने ते अल्लाहच्या मार्गात जिहाद करतात, मग ते आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाही ना धनाची. त्यांच्या दृष्टीने अल्लाहचा आदेश सर्वांत मोठा आहे. भलाई त्यांच्याचकरिता आहे, अर्थात आखिरतची भलाई आणि जन्नतचे सुख काहींच्या मते या जगाचा व आखिरतचा दोन्हींचा फायदा. हेच लोक सफल आणि उच्च पदावर बसण्यायोग्य ठरतील.

(90) ९०. ग्रामीण भागातील अशिक्षित, बहाणा करणारे लोक हजर झाले की त्यांना अनुमती दिली जावी आणि ते बसून राहावेत ज्यांनी अल्लाहशी आणि त्याच्या पैगंबराशी असत्य कथन केले होते. आता तर त्यांच्यात जेवढे काफिर (अधर्मी) आहेत त्यांना दुःखदायक अज़ाब पोहचल्याविना राहणार नाही.

(91) ९१. कमजोर दुबळे आणि आजारी असलेल्यांवर आणि अशा लोकांवर जे खर्च करण्यास असमर्थ आहेत दोष नाही, जोपर्यंत ते अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचे शुभचिंतक असतील. अशा नेक सदाचारी लोकांवर कसलीही कारवाई केली जाऊ नये आणि अल्लाह मोठा माफ करणारा मेहरबान आहे.

(92) ९२. आणि ना त्या लोकांवर जे तुमच्याजवळ येतात की तुम्ही त्यांच्यासाठी वाहनाची व्यवस्था करून द्यावी, तेव्हा तुम्ही त्यांना उत्तर देता की मला तुमच्या वाहनासाठी काहीच आढळत नाही, तेव्हा ते दुःखाने रडत, अश्रू ढाळीत परत जातात की त्यांना खर्च करण्यासाठी काहीही प्राप्त नाही.१
(१) हे मुसलमानांच्या एका समूहाचे वर्णन आहे, अर्थात त्या लोकांचे ज्यांच्याजवळ स्वतःचे वाहन नव्हते आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनीही वाहन उपलब्ध करून देण्याबाबत आपली विवशता जाहीर केली. यावर त्यांना एवढे दुःख झाले की दुःखातिरेकाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्वश्रेष्ठ अल्लाह प्रत्येक उघड आणि लपलेल्या गोष्टीला जाणणारा आहे, त्यांना जिहादमध्ये भाग घेण्यापासून वेगळे केले. किंबहुना हदीसमध्ये उल्लेखित आहे की पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्या अगतिक लोकांविषयी, युद्धात सहभागी होणाऱ्या लोकांना फर्माविले, ‘‘.....तुमच्या मागे मदीनेत काही लोक असेही आहेत की तुम्ही ज्या घाटीला पार करता, आणि ज्या मार्गावर चालता, तुमच्यासह ते मोबदला प्राप्त करण्यात समानरित्या सहभागी आहेत. निकटच्या अनुयायींनी विचारले, हे कसे असू शकते, वास्तविक ते मदीनेत बसले आहेत. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी फर्माविले, ‘‘सबबीने त्यांना तिथे रोखून ठेवले आहे.’’ (सहीह बुखारी, किताबुल जिहाद आणि सहीह मुस्लिम नं. १५१८)

(93) ९३. निःसंशय, आरोप अशा लोकांवर आहे जे धनवान असूनही तुमच्याजवळ अनुमती मागतात. स्त्रियांसोबत घरी बसून राहण्यावर हे खूश आहेत आणि अल्लाहने त्यांच्या हृदयांवर मोहर लावली आहे. ज्यामुळे ते अजाण बनले आहेत.

(94) ९४. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ जाल तेव्हा तुमच्यासमोर सबबी मांडतील. (हे पैगंबर!) सांगा की बहाणे बनवू नका. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. अल्लाहने तुमच्या करतुतींशी आम्हाला अवगत केले आहे आणि अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचे आचरण पाहतील, मग तुम्ही अदृश्य आणि दृश्य गोष्टी जाणणाऱ्याकडे परतविले जाल, मग तो तुम्हाला सांगेल की जे काही तुम्ही करीत होते.

(95) ९५. जेव्हा तुम्ही त्यांच्याजवळ परत जाल तेव्हा ते तुमच्यासमोर अल्लाहची शपथ घेतील, यासाठी की तुम्ही त्यांना त्यांच्या दशेवर सोडावे, यास्तव तुम्ही त्यांना त्यांच्या दशेवर सोडा. निश्चितच ते मोठे अपवित्र आहेत आणि त्यांचे ठिकाण नरक (जहन्नम) आहे, त्यांच्या त्या कर्मांच्या मोबदल्यात, जे ते करीत होते.

(96) ९६. हे तुमच्याजवळ अशासाठी शपथ घेतील की तुम्ही त्यांच्याशी राजी व्हावे. तेव्हा जर तुम्ही त्यांच्याशी राजीही झालात तर अल्लाह अशा दुराचारी लोकांशी राजी होत नाही.

(97) ९७. ग्रामीण लोक इन्कार आणि वरकरणीपणात खूपच सक्त असतात, आणि त्यांनी असे असलेही पाहिजे की त्यांना त्या आदेशांचे ज्ञान नसावे, जे आदेश अल्लाहने आपल्या पैगंबरावर अवतरित केले आहेत आणि अल्लाह खूप खूप ज्ञान बाळगणारा, मोठा हिकमतशाली आहे.

(98) ९८. आणि त्या ग्रामीण लोकांपैकी काही असे आहेत की जे काही खर्च करतात त्याला सजा समजतात आणि तुम्ही ईमानधारकांसाठी वाईट दिवसाच्या प्रतिक्षेत असतात. वाईट प्रसंग तर त्याच्यावरच येणार आहे आणि अल्लाह ऐकणारा आणि जाणणारा आहे.

(99) ९९. आणि ग्रामीणांपैकी काही असेही आहेत, जे अल्लाहवर आणि कयामतच्या दिवसावर ईमान राखतात आणि जे काही खर्च करतात त्याला अल्लाहचे सान्निध्य आणि पैगंबरांच्या दुआ- प्रार्थनेचे साधन मानतात. लक्षात ठेवा की त्यांचे हे खर्च करणे, निश्चित त्यांच्यासाठी, अल्लाहची निकटता प्राप्त करण्याचे साधन आहे. त्यांना अल्लाह अवश्य आपल्या कृपा-छत्रात दाखल करील. अल्लाह मोठा माफ करणारा, दया करणारा आहे.

(100) १००. आणि हे मुहाजिर (मक्केहून मदीना येथे आलेले) आणि अन्सार (मदीना येथील मूळ रहिवाशी) प्रथम आहेत आणि जेवढे लोक, कसल्याही गरजेविना त्यांचे अनुयायी आहेत अल्लाह त्या सर्वांशी राजी झाला आणि ते सर्व अल्लाहशी राजी झाले आणि अल्लाहने त्यांच्यासाठी अशा बागांची व्यवस्था करून ठेवली आहे ज्यांच्याखाली प्रवाह वाहत आहेत, ज्यात ते सदैव राहतील. ही फार मोठी सफलता आहे.

(101) १०१. आणि काही तुमच्या जवळपासच्या ग्रामीणांपैकी आणि मदीनेच्या वस्तीत असे ढोंगी ईमानधारक आहेत, जे दांभिकतेवर अटळ आहेत. तुम्ही त्यांना नाही जाणत, त्यांना आम्ही जाणतो. आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ, मग ते फार मोठ्या शिक्षा- यातनेकडे पाठविले जातील.

(102) १०२. आणि काही दुसरे लोक आहेत, जे आपल्या चुका मान्य करतात, ज्यांनी मिश्र स्वरूपाची कर्मे केलीत. काही चांगली तर काही वाईट. अल्लाहकडून आशा आहे की त्यांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करील. निःसंशय, अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे.

(103) १०३. तुम्ही त्यांच्या धनातून सदका (दान) स्वीकार करा, ज्याद्वारे तुम्ही त्यांना स्वच्छ- शुद्ध कराल आणि त्यांच्यासाठी दुआ- प्रार्थना करा, निःसंशय तुमची दुआ त्यांच्यासाठी समाधानाचे साधन आहे, आणि अल्लाह चांगल्या प्रकारे ऐकतो, चांगल्या प्रकारे जाणतो.

(104) १०४. काय त्यांना हे माहीत नाही की अल्लाहच आपल्या दासांची तौबा (क्षमा-याचना) कबूल करतो आणि तोच दान कबूल करतो आणि हे की अल्लाहच तौबा कबूल करण्यात आणि दया करण्यात परिपूर्ण आहे.

(105) १०५. आणि सांगा की तुम्ही कर्म करीत राहा. तुमचे कर्म अल्लाह स्वतः पाहील आणि त्याचा पैगंबर आणि ईमान राखणारे (ही पाहतील) आणि निश्चितच तुम्हाला अशाजवळ जायचे आहे जो सर्व लपलेल्या व उघड गोष्टी जाणणारा आहे. यासाठी की तो तुम्हाला तुम्ही केलेले प्रत्येक कर्म दाखवून देईल.

(106) १०६. आणि काही दुसरे लोक आहेत, ज्यांचा मामला अल्लाहचा आदेश येईपर्यंत स्थगित आहे. एक तर तो त्यांना सजा देईल किंवा त्यांची क्षमा-याचना कबूल करील आणि अल्लाह मोठा जाणणारा, फार हिकमतशाली आहे.

(107) १०७. आणि काही असे आहेत, ज्यांनी या हेतूने मस्जिद बनविली की नुकसान पोहचवावे आणि इन्कारपूर्ण गोष्टी कराव्यात आणि ईमानधारकांमध्ये फूट पाडावी, आणि अशा माणसाच्या राहण्याची व्यवस्था करावी, जो याच्या पूर्वीपासून अल्लाह आणि त्याच्या पैगंबराचा विरोधक आहे, आणि शपथ घेतील की भलाईखेरीज आमचा कोणताही हेतु नाही आणि अल्लाह साक्षी आहे की ते पूर्णतः खोटे आहेत.

(108) १०८. आपण त्या मस्जिद कधीही उभे न राहावे, परंतु ज्या मस्जिदीचा पाया पहिल्या दिवसापासूनच तकवा (अल्लाहचे भय राखण्या) वर ठेवला गेला असेल, तर ती यायोग्य आहे की तुम्ही तिच्यात उभे राहावे. यात असे लोक आहेत की ते अधिक स्वच्छ-शुद्ध (पाक) होणे चांगले समजतात, आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अधिक पाक राहणाऱ्यांना प्रिय राखतो.

(109) १०९. मग काय असा मनुष्य अधिक चांगला आहे, ज्याने आपल्या इमारतीचा पाया अल्लाहचे भय राखण्यावर आणि अल्लाहची प्रसन्नता प्राप्त करण्यावर ठेवला असेल किंवा तो मनुष्य, ज्याने आपल्या घराचा पाया एखाद्या उतार असलेल्या दरीच्या (घाटाच्या) किनाऱ्यावर, जी कोसळण्याच्या बेतात असावी, त्यावर रचला असेल; मग तो त्यासह जहन्नमच्या आगीत जाऊन पडावा आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह अशा अत्याचारींना मार्ग दाखवित नाही.

(110) ११०. त्यांचे हे घर, जे त्यांनी बनविले आहे, नेहमी त्यांच्या मनाला संशयामुळे (काट्यासरखे) बोचत राहील. परंतु हे की त्यांची हृदयेच क्षत-विक्षत व्हावीत, आणि अल्लाह ज्ञान बाळगणारा आणि हिकमतशाली आहे.

(111) १११. निःसंशय, अल्लाहने ईमानधारकांकडून त्यांच्या प्राणांना व धनांना जन्नतच्या मोबदल्यात खरेदी केले आहे. ते अल्लाहच्या मार्गात लढतात ज्यात ते ठार करतात आणि ठार केले जातात, याबाबत सच्चा वायदा आहे तौरात, इंजील आणि कुरआनामध्ये आणि अल्लाहपेक्षा जास्त आपल्या वायद्याचे पालन कोण करू शकतो? यास्तव तुम्ही आपल्या या विकण्यावर, जो (सौदा) तुम्ही करून घेतलात, आनंदित व्हा आणि ही फार मोठी सफलता आहे.

(112) ११२. हे असे लोक होते, जे तौबा (क्षमा-याचना) करणारे, अल्लाहची उपासना करणारे, त्याची स्तुती-प्रशंसा करणारे, रोजा (उपवास-व्रत) राखणारे (किंवा सत्य मार्गावर चालणारे) रुकूअ (झुकणारे) सजदा करणारे (माथा टेकणारे), चांगल्या गोष्टींचा उपदेश करणारे, आणि वाईट गोष्टींपासून रोखणारे आणि अल्लाहच्या नियमांना ध्यानात राखणारे आहेत आणि अशा ईमान राखणाऱ्यांना शुभ समाचार द्या.

(113) ११३. पैगंबर आणि इतर ईमानधारकांना अनुमती नाही की अनेकेश्वरवाद्यांकरिता माफीची दुआ- प्रार्थना करावी, मग ते नातेवाईक का असेनात. हा आदेश स्पष्ट झाल्यानंतर की ते लोक नरकात जातील.

(114) ११४. आणि इब्राहीमचे आपल्या पित्याकरिता माफीची दुआ-प्रार्थना करणे हे केवळ त्या वचनाच्या सबबीवर होते, जे त्यांनी आपल्या पित्यास दिले होते, मग जेव्हा त्यांना ही गोष्ट स्पष्टतः कळाली की तो (पिता) अल्लाहचा शत्रू आहे, तेव्हा ते त्याच्यापासून दूर झाले. वास्तविक इब्राहीम मोठे कोमलहृदयी सहनशील होते.

(115) ११५. आणि अल्लाह असे नाही करत की एखाद्या जनसमूहाला मार्गदर्शन केल्यानंतर मार्गभ्रष्ट करील, जोपर्यंत त्या गोष्टी स्पष्टतः सांगून टाकत नाही ज्यांच्यापासून त्यांनी अलिप्त राहावे. निःसंशय अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो.

(116) ११६. निःसंशय, आकाशामध्ये व धरतीत अल्लाहचीच राज्य-सत्ता आहे. तोच जिंवत ठेवतो आणि मृत्यु देतो आणि तुमचा अल्लाहखेरीज कोणीही मित्र नाही आणि ना कोणी मदत करणारा.

(117) ११७. सर्वश्रेष्ठ अल्लाहने पैगंबरांच्या स्थितीवर दया-दृष्टी केली आणि देशत्याग करून आलेल्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या अन्सार लोकांच्या स्थितीवरही, ज्यांनी अशा अडचणीच्या वेळी पैगंबरांना साथ दिली, त्यानंतर की त्यांच्यातल्या एका गटाची मने डळमळू लागली होती. मग अल्लाहने त्यांच्या अवस्थेवर दया केली. निःसंशय, अल्लाह त्या सर्वांवर अतिशय मेहरबान आणि दया करणारा आहे.

(118) ११८. आणि तीन माणसांच्या अवस्थेवरही, ज्यांचा मामला स्थगित केला गेला होता येथपर्यंत की जेव्हा जमीन आपल्या (विशाल) विस्तारानंतरही त्यांच्यासाठी संकुचित (तंग) होऊ लागली आणि ते स्वतः आपल्या अस्तित्वाशी हैराण झाले आणि त्यांनी समजून घेतले की अल्लाहपासून कोठेही आश्रय लाभू शकत नाही, याखेरीज की त्यांच्याकडे वळले जावे. मग त्यांच्या अवस्थेवर दया केली. यासाठी की त्यांनी भविष्यातही क्षमा-याचना करावी. निःसंशय सर्वश्रेष्ठ अल्लाह तौबा (क्षमा-याचना) कबूल करणारा आणि अतिशय दया करणारा आहे.

(119) ११९. हे ईमान राखणाऱ्यांनो! सर्वश्रेष्ठ अल्लाहचे भय बाळगा आणि खऱ्या लोकांसोबत राहा.

(120) १२०. मदीना आणि त्याच्या जवळपासच्या गावात राहणाऱ्यांकरिता योग्य नव्हते की अल्लाहच्या पैगंबरांची साथ सोडून मागे राहावे आणि न हे की आपल्या प्राणाला, त्यांच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय आपल्या प्राणाला, त्यांच्या प्राणापेक्षा अधिक प्रिय जाणावे. हे अशामुळे की त्यांना अल्लाहच्या मार्गात जी तहान लागली आणि जो थकवा पोहोचला आणि जी भूक लागली आणि जे चालत गेले, जे काफिरांकरिता क्रोधाची सबब बनली असावी आणि शत्रूंचा जो काही समाचार घेतला, त्या सर्वांबद्दल त्यांच्या नावे (एक एक) सत्कर्म करणाऱ्यांचा मोबदला वाया जाऊ देत नाही.

(121) १२१. आणि जो काही लहान मोठा खर्च त्यांनी केला आणि जेवढी मैदाने त्यांना पार करावी लागली, हे सर्वदेखील त्यांच्या नावे लिहिले गेले यासाठी की सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्या कामांचा चांगल्यात चांगला मोबदला प्रदान करावा.

(122) १२२. आणि ईमान राखणाऱ्यांनी सर्वच्या सर्व मिळून निघू नये. तेव्हा असे का न केले जावे की त्यांच्या प्रत्येक मोठ्या गटामधू लहान गट निघावा यासाठी की त्यांनी दीन (धर्मा) ची समज प्राप्त करून घ्यावी आणि यासाठी की त्यांनी आपल्या जनसमूहाच्या लोकांना, जेव्हा ते यांच्याजवळ येतील (अल्लाहचे) भय दाखवावे, यासाठी की त्यांनी भ्यावे.

(123) १२३. हे ईमान राखणाऱ्यांनो! त्या काफिरांशी (इन्कारी लोकांशी) लढा जे तुमच्या भोवती आहेत आणि त्यांना तुमच्या अंगी कठोरता आढळली पाहिजे. आणि हा विश्वास राखा की सर्वश्रेष्ठ अल्लाह तकवा (धैर्य-संयम) राखणाऱ्यांच्या सोबत आहे.

(124) १२४. आणि जेव्हा एखादी सूरह (अध्याय) अवतरित केली जाते, तेव्हा काही ढोंगी ईमानधारक म्हणतात की या सूरहने तुमच्यापैकी कोणाचे ईमान वाढविले आहे? तेव्हा जे (सच्चे) ईमानधारक आहेत, या सूरहने त्यांच्या ईमानात वृद्धी केली आहे आणि ते आनंदित होत आहेत.

(125) १२५. आणि ज्यांच्या मनात रोग (विकृती) आहे, या सूरहने त्यांच्यात त्यांच्या गलिच्छतेसह आणखी गलिच्छता वाढवून दिली आहे आणि ते कुप्र (इन्कार करण्या) च्या स्थितीतच मरण पावले.

(126) १२६. आणि काय त्यांनी पाहिले नाही की हे लोक दरवर्षी एकदा किंवा दोनदा कोणत्या न कोणत्या संकटात टाकले जातात, तरीही ते ना तौबा (क्षमा-याचना) करतात, ना बोध प्राप्त करतात.

(127) १२७. आणि जेव्हा एखादी सूरह (अध्याय) अवतरित केली जाते तेव्हा एकमेकांना पाहू लागतात की तुम्हाला कोणी पाहत तर नाही, मग चालू लागतात. अल्लाहने यांचे मन फिरविले आहे या कारणाने की ते समजून न घेणारे लोक आहेत.

(128) १२८. तुमच्याजवळ एका अशा पैगंबराचे आगमन झाले आहे, जे तुमच्यापैकीच आहेत, ज्यांना तुमच्या हानीविषयक गोष्टी खूप क्लेशदायक वाटतात जे तुमच्या लाभाचे मोठे इच्छुक असतात. ईमान राखणाऱ्यासाठी अतिशय स्नेहशील व मेहरबान आहेत.

(129) १२९. मग जर ते (लोक) तोंड फिरवतील तर तुम्ही त्यांना सांगा की माझ्यासाठी अल्लाह पुरेसा आहे, त्याच्याखेरीज कोणीही सच्चा माबूद (उपास्य) नाही. मी त्याच्यावरच भरोसा केला आणि तो फार मोठ्या अर्श (सिंहासना) चा मालक (स्वामी) आहे.